शरद गोविंद पवार !
माणसाच्या जन्माची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याचे प्राक्तन कसे घडणार, हे सुनिश्चीत करत असतेच. शून्यातून विश्व निर्माण करणारांना लाभलेला शून्याचा आकार केवढा होता हे पाहण्याची आपली पद्धत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला आलेला शून्य देखील सारखा नसतोच. पवारांना लाभलेला शून्य काळाच्या बराच पुढचा होता.
शरद गोविंद पवार हे नाव कुठल्याही सामान्य माणसाला सहज चपखल बसू शकेल. या नावाचा शेतमजूर असू शकतो. गवंडी किंवा शाळेत शिपाई देखील असू शकतो. गावाचे नाव सुद्धा काटेवाडी म्हणजे फार काही आकर्षक नाही. शिक्षण बी.कॉम. म्हणजे आजच्या काळात तेही फार मोठे नाही. पण हा जन्मला एका सत्यशोधकी विचारांच्या कुटुंबात. १८८५ला कॉन्ग्रेस पक्षच स्थापन झाला असे नाही. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज देखील त्याच वर्षी स्थापन झाले आणि नीरा उजवा कालवा देखील त्याच वर्षी वाहू लागला. बारामतीचे शेतकरी बागायतदार झाले. पाच दशकांची बागायती सुबत्ता वारसा म्हणून पवार कुटुंबात नांदल्यावर १९४०ला शरद पवार जन्मले. आर्थिक, सामाजिक व वैचारिक सुबत्तेचे हे संचित पवारांच्या घरात राजकीय सुबत्ता देखील घेऊन आले.
पवारांची आई शारदाबाई या जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्या म्हणून बारामतीचे प्रतिनिधित्व करू लागल्या. घरातच शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेच्या हालचाली झाल्या. कट्टर शेकापचे असलेल्या कुटुंबातून शरद पवारांनी मात्र आपल्या राजकीय जीवनासाठी कॉन्ग्रेसची निवड केली व हा निर्णय त्यांच्यापुरता तरी अचूक ठरला !
पुढचा इतिहास सर्वश्रुत व सर्वज्ञात आहे. त्याची उजळणी करण्याची गरज नाही. समकालीन राजकीय नेत्यांत शरद पवार या नावाची वेगळी आणि सातत्यपूर्ण यशाची मोहोर उमटविण्याची शिकस्त पवार अथकपणे करत राहिले. समाजवादी विचारांचा प्रभाव असताना त्यांनी केलेल्या बंडाचे नाव समाजवादी कॉन्ग्रेस होते. दुसऱ्यांदा बंड करायची वेळ आली तेव्हा समाजवाद पिछाडीला जाऊन राष्ट्रवादाचे वारे वाहू लागले होते. पवारांनी आपल्या या नव्या बंडाचे टायमिंग साधणारे घड्याळ चिन्ह आणि पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस केले !
कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते असे तिघाडीचे सरकार महाराष्ट्रात आणून त्यांनी नुकताच इतिहास घडवला. असा इतिहास पवारच घडवू शकतात. कारण, भूतकाळात रमायचे नाही, नजिकच्या भविष्याचा विचार करून सदैव वर्तमानकाळातली समीकरणे साधायची ही त्यांच्या राजकारणाची पठडी राहिली आहे.
राजकीय नेत्यांसाठी 'अवघे पाऊणशे वयमान' ही अगदीच सामान्य बाब असल्याने पवारांचे ८० हे वय फार वयोवृद्ध श्रेणीत जात नाही. त्यांच्या मुळच्या दणकट प्रकृतीवर मधल्या काळात जे आघात झाले ते पचवून पवार सगळ्या 'हितचिंतकांचे' अंदाज चुकवत राहिले !
त्यांना यापुढेही असेच सगळ्यांचे अंदाज चुकवत दीर्घ आयुष्य लाभावे, हीच मंगल कामना !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -