छत्रपती शिवाजी महाराज-सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषांत विाविशारद व धुरंदर राजकारणी होते.राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले होते. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहानसहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. संभाजी महाराजांना प्रजेबद्दल आदरभाव होता.
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजेंनाही सोबत घेतले होते. त्यावेळी संभाजी राजे अवघ्या नऊ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजी राजेंवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजी राजेंचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर २० नोव्हेंबर १६६६ रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजी राजेंनी केलेल्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर 'समयनय' हा ग्रंथ संभाजी राजेंनी लिहून घेतला. 'धर्म कल्पलता' हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो.छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. ते कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांची नियुक्ती करण्यात आली होती.
'श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||', अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
#तारे जमी पर -